भा.क.प.ची 26 जानेवारीपासून ‘संविधान बचाव, देश बचाव’मोहीम
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने सीएए व एनआरसी कायदा लादून देशाच्या संविधानावर हल्ला चढविला आहे. याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होता आहेत. आता या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशभर 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान ‘संविधान बचाव, देश बचाव’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते गाव, शहर, जिल्हा अशा ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करतील. तसेच पक्षाच्यावतीने मराठीत प्रकाशित करण्यात आलेल्या प्राचार्य कॉ. आनंद मेणसे लिखित ‘ एनआरसी/ सीएए ला विरोध का?’ या जागृती पुस्तिकेचे वितरण करतील. महाराष्ट्रात ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय पक्षाच्या मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्य सचिव मंडळ आणि राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड भालचंद्र कानगो यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला राज्य सरचिटणीस कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ. नामदेव गावडे यांच्यासह पक्षाचे राज्य सचिव मंडळ आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कॉ. कानगो यांनी देशातील सद्य राजकीय परिस्थितीबाबत, तसेच सीएए व एनआरसीबाबत पक्षाच्या भूमिकेच्या संबंधाने मार्गदर्शन केले. लोकांच्या आर्थिक प्रश्नांवरून, देशाच्या संकटग्रस्त आर्थिक परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सीएए व एनआरसीच्या संबंधाने होत असलेले आंदोलन चालूच ठेवले पाहिजे. या प्रश्नांबाबत पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकांची विक्री मोहीम केली पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी राज्य सचिव मंडळने व राज्य कार्यकारिणीने विविध प्रश्नांबाबत चर्चा करून, सर्व जिल्ह्यांनी 31 जानेवारीपर्यंत सभासद मोहीम पूर्ण करावी असे ठरविण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकात स्वतंत्र अथवा शक्य तिथे धर्मनिरपेक्ष, लोकाशाहीवादी पक्षांबरोबर आघाडी करून निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, 1 व 2 फेब्रुवारी रोजी मुंई येथे होत असलेल्या ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे 15 राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.