मुंब्य्रात अडकलेल्या मजुरांना तत्काळ रेल्वे सेवा पुरवा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी
मुंबई : मुंब्रा येथे राहणारे प्रवासी कामगार रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकाळत बसले आहेत. त्यांना मुंब्रा पोलिस स्टेशनमार्फत 1 जूनला बिहारला रेल्वे सुटेल असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात रेल्वे न सुटल्याने सुमारे 900 लोक मुंब्रा स्टेनशवर अडकून पडले आहे. राहायला घर नाही व त्यातच वाढत असलेला पाऊस यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. अशावेळी त्यांना तत्काळ रेल्वे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबईचे नेते कॉ. प्रकाश रेड्डी यांनी केली आहे. याबाबतचे एक मागणीपत्र त्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठविले आहे.
मुंब्रा येथे राहणाऱ्या प्रवासी कामगारांनी बिहारला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पोलिस स्टेशनमार्फत नोंदणी केली आहे. यातील 900 कामगारांना पोलिस स्टेशनमार्फत 1 जूनला बिहारला जाण्यासाठी रेल्वे सुटेल असे सांगण्यात आले. त्यानुसार ते 1 जूनला सकाळीच मुंब्रा पोलिस स्टेशनच्या आवारात पोहचले. पण नंतर त्यांना सांगण्यात आले, की रेल्वे रद्द झाली आहे. वास्तविक ते सर्व कुटुंबासहीत याठिकाणी पोहचले आहेत. शिवाय ते राहत असलेल्या घराचे पूर्वीचे भाडे भरून त्यांनी आपला पूर्ण बाडबिस्तरा गुंडाळून ते आले आहेत. आता त्यांना घरीदेखील जाता येत नाही. तसेच पोलिस स्टेशनच्या आवारातून त्यांना हाकलले जात आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने त्यांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने रेल्वे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.