ज्येष्ठ पत्रकार कॉम्रेड मधु शेट्ये यांचे निधन
मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, निर्भिड पत्रकार, माजी नगरसेवक कॉम्रेड मधु शेट्ये यांचे बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.
मुंबई प्रेस क्लबचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते. कॉ. शेट्ये यांनी पत्रकारिता तसेच पत्रकार यांचेसाठी तसेच कष्टकरी सामान्य जनता यांचेसाठी आपले सर्व जीवन वेचले. कुठेही, कुणावरही अन्याय होवो मधु त्यांच्या मागे असत.
कॉ. मधु शेट्ये कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला. त्यांनी शिक्ष अर्धवट सोडून स्वातंत्र लढ्यात उडी घेतली. मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. मार्क्सवादाचे ते गाढे अभ्यासक होते.
त्यांचा गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी जिवंत संबंध होता. प्रत्येक आंदोलनात ते अग्रेसर असत, त्यासाठी मोर्चे, सभा आदीत सहभागी असत. १९६१ मध्ये ते ताडदेव भागातून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते एक अभ्यासू नगरसेवक होते. महापालिकेत त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला होता. १९६६ ते १९६८ साली ते स्थायी समितीचे सदस्य होते. त्यावेळी मुंबई महापालिकेचे केवळ ४०० कोटींचे बजेट होते. त्यावेळची त्यांची भाषणे अत्यंत गाजली. चिखलवाडी, बेलासीस रोड या भागात त्यांचे विशेष काम होते.
पत्रकारितेची सुरूवात त्यांनी फ्री-प्रेस या इंग्रजी दैनिकांतून सुरू केली. त्या ठिकाणीही त्यांचा विशेष दबदबा होता. पत्रकारांना त्यांनी बहुमान मिळवून दिला. त्यानंतर १९७० च्या सुमारास त्यांनी दिल्लीहून निघणाऱ्या कॉ. अरुणा असफअली यांच्या ‘पेट्रीयट’ या दैनिकात तसेच ‘लिंक’ विकलीमध्येही काम केले.
बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांच्या प्रार्थिवावर गिरगाव चंदनवाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्ध आर्किटेक्ट माजी आमदार चंद्रशेखर प्रभू, श्री. नरेंद्र वाबळे (अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ), प्रसाद मोकाशी, कॉ. प्रकाश रेड्डी, गुरुवीर सिंग आदींची कॉ. मधु शेट्ये यांच्या आठवणी जागरूक करणारी श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
कॉ. मधु शेट्ये यांच्या मागे त्यांच्या पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुखात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल, युगांतर परिवार सहभागी आहे.