skip to Main Content

ऑल इंडिया स्टूडंटस्फेडरेशन (A.I.S.F.)

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा संग्राम नव्हता, तर सरंजामशाही, आर्थिक व सामाजिक विषमता यासारख्या दृष्ट प्रवृत्ती विरोधातील हा लढा होता. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाचे स्वरूप हे व्यापक अशा मानवमुक्तीच्या संग्रामाचे स्वरूप होते. याच काळात विद्यार्थी वर्गाला संघटित करून त्याला स्वातंत्रचळवळीच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ए.आय.एस.एफ. ने केले.

ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (ए.आय.एस.एफ.) या राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या विद्यार्थी संघटनेची स्थापना 12 ऑगस्ट 1936 रोजी लखनौ येथे झाली. या स्थापना अधिवेशनाचे उद्‌घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. तर बॅरिस्टर महंमद अली जिना अध्यक्षस्थानी होते. या अधिवेशनात प्रेमनारायण भार्गव यांची ए.आय.एस.एफ. च्या राष्ट्रीय महासचिव म्हणून निवड करण्यात आली.

ए.आय.एस.एफ.च्या स्थापनेचा काळ लक्षात घेतला, तर तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता. मुळात ए.आय.एस.एफ. ची स्थापना झाली, ती म्हणजे देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी! स्वातंत्रलढ्यामध्ये विद्यार्थी-युवकांचा सहभाग वाढावा आणि देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ए.आय.एस.एफ. ची स्थापना करण्यात आली. या काळात देशभर विस्तारलेल्या ए.आय.एस.एफ. च्या असंख्य कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले.

ए.आय.एस.एफ. ने साम्राज्यवादविरोधी भूमिका घेऊन देशभरात आंदोलनाची हाक दिली. 26 जानेवारी 1940 हा दिवस “प्रजासत्ताक दिन’ म्हणून पाळण्याचे आवाहन केले. ए.आय.एस.एफ. ची आक्रमकता पाहून अनेकदा ब्रिटिशांनी ए.आय.एस.एफ. ची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला. पण ए.आय.एस.एफ. च्या कार्यकर्त्यांनी त्याला न जुमानता आपला लढा अखंडपणे सुरूच ठेवला.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. याचा आनंद देशभर ए.आय.एस.एफ. ने साजरा केला. पण स्वातंत्र्यानंतर देशाची वाटचाल ज्या पद्दतीने झाली, त्यामुळे प्रश्‍न सुटण्याऐवजी वाढतच गेले. याला बव्हंशी सरकारची धोरणे जबाबदार होती. म्हणूनच ए.आय.एस.एफ. ने देशाची पुनर्बांधणी, रोजगार उपलब्धी, औद्योगिक विकास, योजनाबद्द आर्थिक विकास, गरिबी निर्मूलन, शिक्षणाची समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्‍न अशा विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा सुरू केला.

1955 नंतर गोवा मुक्ती संग्रामासाठी देशभरातील जनता आंदोलने करू लागली होती. ए.आय.एस.एफ. ने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि स्वत:ही आंदोलनात सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर ए.आय.एस.एफ. ने अन्य सामाजिक प्रश्‍नांबरोबरच शैक्षणिक प्रश्‍नांवर अधिक भर दिला. “शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे, सर्वांना मोफत, समान व सक्तीचे शिक्षण मिळालेच पाहिजे, सर्वांना काम मिळालेच पाहिजे’ अशा मागण्या घेऊन ए.आय.एस.एफ. ने आपला संघर्ष तीव्र केला.

पाकिस्तानने 1965 साली भारतावर केलेल्या हल्याचा ए.आय.एस.एफ. ने कडाडून विरोध केला. या काळात भारताची स्थिती अतिशय बिकट होत चालली होती. आर्थिक प्रश्‍न गंभीर बनत चालले होते. पण सरकार मात्र कल्याणकारी निर्णय घेण्याऐवजी प्रस्थापित वर्गाच्या हिताचे निर्णय लादू पाहत होते. याचा ए.आय.एस.एफ. ने विरोध करत आंदोलनाचे हत्यार उपसले. 1979 मध्ये ए.आय.एस.एफ. ने “काम दो या जेल दो’ हे अभिनव आंदोलन उभारले. यामध्ये अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले.

90 च्या दशकात जातीयवादी, धर्मांध, लोकशाहीविरोधी, अतिरेकी संघटनांची ताकद वाढत चालली होती आणि त्यामुळे देशाची एकता धोक्‍यात येऊ लागली होती. या विरोधात ए.आय.एस.एफ. ने “बचाओ भारत-बदलो भारत’ असा नारा देत देशभर आंदोलने केली. 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव सरकारने नवीन आर्थिक धोरणे राबविण्यास सुरवात केली. जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण धोरणामुळे इतर क्षेत्रांबरोबरच शिक्षण क्षेत्राची प्रचंड वाताहत झाली. या विरोधात विद्यार्थ्यांनी 1992 साली देशव्यापी संप घडवून आणला. आजही ए.आय.एस.एफ. सरकारच्या या “खाउजा’ धोरणाचा तीव्र विरोध करत आहे.

अलीकडच्या काळात सरकार शिक्षणाबाबत दिवसेंदिवस उदासीन होत चालले आहे. सरकार स्वत:ची जबाबदारी झटकून शिक्षणक्षेत्र खासगी व्यापारी, भांडवलदारांच्या स्वाधीन करत आहे. भविष्यात येऊ घातलेली परदेशी विद्यापीठे, खासगी विद्यापीठे हे त्याचेच द्योतक आहे. सध्या मेडिकल, इंजिनिअरिंग, इतकेच काय साधे बालवाडीला ऍडमिशन घ्यायचे झाले, तरी भरमसाट डोनेशन भरावे लागत आहे. त्यामुळे सामान्य वर्गातील मुलांना शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. म्हणूनच या परिस्थितीत ए.आय.एस.एफ. ने “शिक्षण वाचवा-देश वाचवा’ ही मोहीम देशभर राबविली. या मोहिमेची सरकारलाही दखल घ्यावी लागली.

अशा अनेक मोहिमांच्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून ए.आय.एस.एफ. ने सातत्याने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी झगडा केला आहे. पण आजही शिक्षणक्षेत्रातील बरेचसे प्रश्‍न सुटू शकलेले नाहीत. उलट नवनवे प्रश्‍न उभे राहत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील भविष्यातील अनागोंदीबद्दल आजच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणावी तशी जागृती नाही. अशावेळी विद्यार्थ्यांना नवनव्या आव्हानांची जाणीव करून देण्यासाठी ए.आय.एस.एफ. ने प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. इतकेच नव्हे, तर या आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थी वर्गाला तयार करण्याचे कार्यही सुरू आहे.

आजही देशभरातील लाखो विद्यार्थी ए.आय.एस.एफ. च्या झेंड्याखाली संघटित होऊन, विविध शैक्षणिक प्रश्‍नांसाठी व्यापक संघर्ष उभारत आहेत. 1936 पासून आजअखेर ए.आय.एस.एफ. ने आपल्या 75 वर्षांच्या वाटचालीत असंख्य कार्यकर्त्यांच्या संघर्षातून लढाऊ वाटचाल केली आहे. विद्यार्थी संघर्षाच्या या गौरवशाली लढाऊ परंपरेचा समस्त विद्यार्थी वर्गाला सार्थ अभिमान आहे.